डॅडी तुमच्याशिवाय ...
डॅडी तुमच्याशिवाय ...
(१ मार्च, २०२५ रोजी माझ्या वडिलांना, ज्यांना मी डॅडी म्हणतो, त्यांना देवाज्ञा झाली ... या दुःखद प्रसंगाने भावना अनावर झाल्या, त्यांना शब्दरूपाने वाट करू देण्याचा हा एक प्रयत्न 🙏🏼)
त्या एका दिवशी सारं आयुष्य थांबलं,
वाऱ्याने निखळलेली पाने जशी जमिनीत गडप होतात, तसंच काहीसं तुमचं झालं डॅडी,
त्या क्षणात ... गेल्या कित्येक दिवसांचा काळोख डोळ्यांसमोर तरळला ...
ते डॉक्टरांचे रिपोर्ट्स, त्या भयंकर चाचण्या, तो प्रत्येक सुईचा वेदनादायक चटका, आणि तुम्ही, रोज थोडे थोडे विरत चाललेले ...
साऱ्या रात्री जागून तुमच्या श्वासांची गणती केली, कधी थरारले, कधी मंदावले,
कधी वाटलं, अजून काही दिवस असतील आपले, कधी भीती वाटली, हीच का ती शेवटची रात्र?
“जाने नही देंगे तुझे” असं म्हणत मी, श्रावणी आणि शैलेश 3 Idiots सारखे धडपडत राहिलो, पण ...
तुमच्या शरीरातील पेशींसारखी आशाही लोपत गेली,
तुम्ही तुमचं शरीर विसरून गेलात,
आम्ही सर्वोपरी प्रयत्न करत राहिलो, पण तो सगळा प्रवास असह्य होता, डॅडी ...
तो शेवटचा दिवस आठवतो, तुमची धडधड वाढली होती,
मी नर्सेस आणि डॉक्टरांच्या मागे धावपळ करत होतो, आणि तुम्ही डोळ्यांनीच निरोप घेत होतात,
आम्ही तुम्हाला सावरायला गेलो, पण काळाने तुम्हालाच अलगद सोबत नेलं...
आणि आता ... घर तुमच्याशिवाय निरस झालंय, तुमच्या हसण्याचा गजर विरून गेलाय,
तो सकाळचा तुमचा आवडता चहा, आणि तुमच्यासोबत वाचलेले रोजचे वर्तमानपत्र,
आज फक्त ओस पडलेल्या सीटिंगवर सामावलं आहे...
तुम्ही नसलात तरी, सगळीकडे तुमच्याच आठवणी,
कधी कोपऱ्यात पडलेला तुमचा चष्मा, तुमच्या हाताने नेहमी नीटनेटका ठेवलेला तुमचा बेड,
कधी तुमच्या अस्तित्वाने भारलेला देवघराचा दरवळ...
तुमची माया, तुमचं प्रेम, तुमचं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं बघणं,
घरातल्या प्रत्येकाला समजून घेणं, कधी श्रावणीला दवाखान्यात आणि घरी मदत करणं,
अद्वैत-सृजनला बोट दाखवेल ते खेळणं घेऊन देणं,
कुणीही १० मागितले तर १०० रु. काढून देणं,
माझ्या कामासाठी स्वतःची रूम रिकामी करून देणं,
घरात काय हव नको तिकडे नेहमी लक्ष ठेवणं, तुमच्याशिवाय हे सगळं आता फक्त आठवणीत उरलंय.
तुमचे मित्र, नातेवाईक तुमच्या आठवणींनी भरलेले, तुम्हाला हरवून आता रिक्त झाले,
तुमच्या उपस्थिती शिवाय तुमचा कट्टा उदास-भकास वाटतोय,
तुमचा नेहमी आनंदी राहण्याचा स्वभाव, सगळ्यांना जोडून ठेवण्याची धडपड,
सगळ्यांना रोज पाठवलेले Good Morning चे मेसेज,
सर्वांना वेळोवेळी पाठवलेल्या शुभेच्छा, आता हे सारे बंधही तुटल्यासारखे वाटतात.
शिक्षण आणि काम हाच खरा धर्म, हे तुमच्या शब्दांसारखं अढळ सत्य आजही मनात कोरलंय,
तुम्ही शिकवलं होतंत, मेहनत कधी व्यर्थ जात नाही, पण डॅडी ... तुमची अनुपस्थिती भरून काढण्याची मेहनत कुठून आणू?
तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा, दर गुरुवारी घासुन पुसून केलेली दत्ताची पूजा, दर संकष्टीला मनोभावे केलेला गणपतीचा हार, नातवंडांपेक्षाही अधिक उत्साहाने साजरे केलेले सारे सण, गणेशोत्सवाला उत्साहाने केलेले ते डेकोरेशन …
आताही हे सगळं असेल, पण …
तुमच्या उत्साहानं, विश्वासानं आणि भक्तीनं भारलेले नसेल 😔
काळ पुढं चालत राहील, असं म्हणतात, पण मन तिथंच अडकलंय – तुमच्या शेवटच्या श्वासात, त्या आठवणींमध्ये, त्या शिकवणीत,
आणि त्या प्रश्नात – तुमच्याशिवाय... आता पुढे कसं डॅडी? 😢
Comments
Post a Comment