दिवाळी
दिवाळी
चाहूल लागता थंडीची, अन सुट्ट्यांची ही घेऊन स्वारी,
झाली नवरात्र-दसरा मग ही, आनंदाची येई दिवाळी ।।
खुशबुदार ते उटणे लेपून, सुगंधित तेलाने मालिश भारी
मळ हातावर अत्तर सुवासिक, अन मऊ रेशमी वस्त्र भरजरी ।।
गोड बुंदी बेसन लाडू, तिखट खुसखुशीत खमंग चकली,
चटकदार तो चिवडा अन जिभेवर, विरघळणारी शंकरपाळी ।।
सुं सुं करीत अग्निबाण तो जाई आकाशी, अन फटाक्यांची आतषबाजी,
चटचट आवाज अन धग जाणवीत मी उडवत राही शत फूलबाजी ।।
प्रियजनांच्या सहवासात मन, उंच उंच मारी भरारी,
नेत्र नसतील जरी मला पण, इंद्रियांची ही दिवाळी ।।
(एका अंध मुलीची ही दिवाळी, तिच्या दृष्टिकोणातून !!दृष्टिकोण … हा शब्दही किती गमतीदार आहे न? तिला दृष्टी नसूनही दृष्टीकोण/ Perspective आहेच की. एक इंद्रिय निकामी असले तरी नाक, कान, जीभ आणि त्वचा ही इंद्रिये अधिक जोमाने काम करतात आणि कल्पनांच्या डोळ्यांसह तिला संपूर्ण अनुभव प्राप्त करून देतात ... बघा ती पुढे काय म्हणते ते)
जरी हे सारे दिवे न दिसती, मन:चक्षूने सर्व अनुभूती
ज्ञानदीप हा सदा तेवती, मन मंदिरात प्रभा उजळती ।।
Comments
Post a Comment